मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2017 02:19 PM (IST)
नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चाय पे चर्चा केली होती, तिथले 150 शेतकरी मोदींना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन द्यायला दिल्लीत जाणार आहेत. 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हे शेतकरी 24 तासांचं आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 20 मार्च 2014 रोजी मोदींनी यवतमाळच्या दाभडी गावात चाय पे चर्चाचा कार्यक्रम केला होता. महाराष्ट्रात यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. त्यामुळे हे ठिकाण मोदींनी निवडलं होतं. कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल इतका एमएसपी देऊ, इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी जिथे कापूस निघतो, तिथेच बाजारपेठ उभारु, अशी बरीच आश्वासनं देण्यात आली होती. मात्र तीन वर्षानंतरही याची पूर्तता झाली नसल्याने हे शेतकरी दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषण करणार आहेत. वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन करुन हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघतील. काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.