पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमाळकर यांनी नियुक्ती झाली आहे.
राज्यपाल आणि कुलपती सी विद्यासागर राव यांनी याबाबतची घोषणा केली.
विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता डॉ. नितीन करमाळकर हे कार्यभार सांभाळतील.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली. डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर अशी काही नावं या 36 जणांच्या यादीत पाहायला मिळाली होती.
शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुप्रसिद्ध आहे. शिवाय ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशीही या विद्यापीठाची ओळख आहे. त्यामुळेच या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मान कुणाला मिळतो, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागलं होतं.
कोण आहेत डॉ. नितीन करमळकर?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे गेल्या 25 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केलं आहे.
संबंधित बातम्या
कोण होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु?