सोलापूर : पंढरपूर नगरपालिकेतील नगरसेवकची निर्घृण हत्या झाली आहे. संदीप पवार असे नगरसेवकाचे नाव असून, त्यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली.


आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संदीप पवार हे श्रीराम हॉटेलमध्ये आले. त्यावेळी अचानक दोघांनी येऊन त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करुन पळून गेले.

अत्यंत रहदारीचा असलेला हा मुख्य मार्ग असून गुढीपाडव्यामुळे हजारो भाविक या परिसरात होते. हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन पोबारा केला. यानंतर पोलिसांच्या मदतीने पवार यांना उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.

संदीप पवार हे अपक्ष आहेत. त्यांची आई आणि वडील हे दोघेही पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. संदीप पवार यांचे वडील दिलीप पवार यांची देखील काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे हत्या झाली होती. पवार कुटुंब हे सुरुवातीपासून माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या गटातील मानले जातात.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यावरुन ते हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. हल्ला केल्यावर तेथून दोन दिशेला मोटारसायकल गेल्याचे समजताच पोलिसांचा त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.