कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक किलोच्या गुळाचे सौदे सभापती कृष्णात पाटील यांच्या हस्ते काढण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गूळ उत्पादक, व्यापारी उपस्थित होते.


या एक किलोंच्या बॉक्सचे सौदे साताप्पा बुरगे यांच्या आडत दुकानी निघाले. वरणगे पाडळीच्या रतन पाटील या गूळ उत्पादक शेतकऱ्याने साडेचार टन एक किलोचा गूळ सौद्यात विक्रीसाठी आणला होता. यावेळी 5 हजार 100 रुपये प्रति क्विंटल असा मुहूर्ताच्या सौद्यातील गुळाला दर मिळाला.

एक एप्रिल 2017 पासून आज अखेर शेती उत्पन्न बाजार समितीत 30 किलोचे एकूण रव्याची 21 लाख 26 हजार 391 इतकी आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गुळाची आवक 1 लाख 66 हजार 948 ने वाढली आहे.

संपूर्ण हंगामात सरासरी 2800 ते 3100 रुपये प्रति क्विंटल असा दर राहिला, तर एक किलोच्या गूळ रव्यांना सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल असा दर राहिला आहे.

दरम्यान, हंगाम आता अंतिम टप्यात असून या महिनाअखेरपर्यंत हंगाम संपुष्टात येईल.