नागपूर : अॅट्रॉसिटी कायदा रद्द करता येत नाही, हा कायदा रद्द करण्याची कुठलीही योजना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची नाही, तसा विचारही नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात काल 60 व्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात ते बोलत होते.

"जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी आहे, तो कधीच या कायद्याचा दुरुपयोग करणार नाही. जर कोणी दुरुपयोग करत असेल तर आंबेडकरांचा अनुयायी असूच शकत नाही. कायद्याचा दुरुपयोग होत असेल, तक्रारी असतील, तर निश्चितपणे राज्य सरकार दुरुपयोग होऊ देणार नाही," असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

'मराठा मोर्चा दलितविरोधी नाही'

"याशिवाय मराठा समाजाच्या मूक मोर्चांमुळे दलित समाजात अस्वस्थता आहे. मात्र हे मूक मोर्चे दलित समाजाविरोधात नाहीत, त्यामुळे त्यांनी अस्वस्थ होऊ नये. सरकार म्हणून मराठा समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण दूर करणं ही आमची जबाबदारी आहे. घटनाकार डॉ बाबासाहेबांनीच घटनेच्या माध्यमाने ती जबाबदारी सरकारवर सोपवली आहे. राज्यातील सर्व प्रश्न संघर्षाऐवजी संवादाने सोडवावेत," असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

अॅट्रॉसिटीत बदल केले तर राजीनामा देईन : आठवले



याच कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात इशारा दिला. मुख्यमंत्रीसाहेब आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आम्ही मराठा आरक्षणाविरोधात नाही. त्यामुळे ज्यांना आरक्षण द्यायचं आहे ते द्या, मात्र, आमच्या अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावू नका. आम्ही खतरनाक लोक आहोत. आम्ही मृत्यूलाही घाबरत नाही. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल केले तर मी राजीनामा देईन, असं आठवले म्हणाले.

पाहा व्हिडीओ