पंढरपूर: तुमचा एटीएम पासवर्ड गुप्त ठेवा. अगदी एटीएम बाहेरच्या सुरक्षारक्षपासूनही. कारण पंढरपुरात एसबीआय एटीएमच्या सुरक्षा रक्षकानंच बँकेला 22 लाखाला लुटलं आहे.


 

नवनाथ जाडकर, पंढरपूरच्या एसबीआयच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. पण हे काम करतानाच त्यानं बँकेच्या 22 लाख 50 हजार रुपयावर हात मारला. तोसुद्धा एटीएम न फोडता. कुठलीही तोडफोड न करता.

 

मशीनमधून पैसे काढताना नवनाथ सीसीटीव्ही आणि वीज बंद करायचा. त्यामुळं त्याच्या हालचालीही बँकेला कळत नव्हत्या. तिकडं 22 लाखाची रोकड लंपास झाल्यानं अधिकारी हैराण झाले. त्यांनी एटीएम यंत्रणा नादुरुस्त तर नाही ना, याची पाहणी केली. पण काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

 

बँक अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली.. पहिल्यांदा दिशाभूल करणारी उत्तरं देणाऱ्या नवनाथला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. खरंतर एटीएममध्ये पैसे ठेवताना, काढताना बँक अधिकाऱ्यांनी पासवर्ड गुप्त ठेवण्याची हुशारी दाखवायला हवी होती. पण तसं झालं नाही. दुसरीकडे नवनाथला पैशाची हाव सुटली. दोन्ही परिणाम म्हणजे बँकेला 22 लाखाचा चुना लागला. आता त्याची भरपाई कुणाकडून करणार हा प्रश्न आहे.