मुंबई : नोबेल पारितोषिक विजेता असलेल्या अब्दुस सलाम यांनी स्थापन केलेल्या ICTP ह्या इटलीतील नामांकित संस्थेचे संचालक म्हणून अतिश दाभोलकर यांची निवड करण्यात आली आहे. युनेस्कोच्या सहायक संचालकाच्या समकक्ष हे पद आहे. 56 वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्रेणीने नोव्हेंबरपासून या पदाची पाच वर्षांसाठी धुरा सांभाळणार आहेत.



डॉ.दाभोलकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे काका होते. त्यांचे वडील श्रीपाद दाभोलकर यांनीदेखील ‘प्रयोग परिवार’च्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे.

हार्वर्ड विद्यापीठात संशोधनकार्य केल्यानंतर त्यांनी 1996 साली भारतात येत 2010 पर्यंत ते मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ मध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे.  त्यानंतर फ्रान्समध्ये सोरबोन विद्यापीठ आणि ‘सीएनआरएस’मध्ये (नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च) ते 2007 पासून संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ.अतिश दाभोलकर यांच्या कार्याने प्रभावित होऊन जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ.स्टीफन हॉकिंग स्वत: त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले होते. 1995 साली डॉ.दाभोलकर यांनी  स्ट्रींग थिअरीवर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी हॉकिंग यांनी कॅलिफोर्नियात त्यांची भेट घेतली होती.

काय आहे ICPT?
नोबेल पुरस्कार विजेते अब्दुस सलाम यांनी 1964 मध्ये ‘आयसीटीपी’ची स्थापना केली आहे. मूलभूत संशोधनाबरोबर जगभर वैज्ञानिक क्षमता विकसित करण्यासाठी ‘आयसीटीपी’प्रयत्न करते. दरवर्षी जगभरातील ६००० हून अधिक वैज्ञानिक वेगवेगळ्या पातळीवरील वैज्ञानिक संशोधनासाठी तेथे भेट देतात.  इटालियन सरकार, आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्था (आयएईए), आणि ‘युनेस्को’ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार कार्यरत असणारी ‘आयसीटीपी’ ही युनेस्कोची प्रथम श्रेणीची संस्था आहे.

अंनिसच्या कार्यात देखील सक्रीय सहभाग
अतिश एक प्रतिभावंत शास्त्रज्ञ असून महाराष्ट्र अंनिसचे खंदे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित व्हावा म्हणून त्यांनी स्वत: प्रयत्न करून ACT NOW नावाची वेबसाईट स्वतः तयार करून चालवली होती. सोबतच दीडशेपेक्षा अधिक शास्त्रज्ञांचा पाठिंबा ह्या कायद्यासाठी मिळवला होता.    ICTP ह्या इटलीतील नामांकीत संस्थेचे संचालक म्हणून अतिश दाभोलकर यांची निवड करण्यात आली आहे.  खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, असे अंनिसचे हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.