Nagpur News : अधिवेशन काळात विधानभवन परिसरात मर्यादित प्रवेश आणि सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेऊन संसदेप्रमाणेच नागपूर विधानभवन परिसरातही मध्यवर्ती 'बारकोड' पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख राहण्यात मदत होणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिली. 


अधिवेशन परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मोजक्या आणि सुरक्षित प्रवेशाची संसदेच्या धर्तीवर मध्यवर्ती बारकोड पद्धत अवलंब व्हावी, प्रवेशिका स्कॅन करुन प्रवेश व्हावा, अशी सूचना नार्वेकर यांनी केली. बदलत्या परिस्थितीत नागपूर येथील सभागृहाच्या परिसराला विस्तारित करणे आवश्यक आहे. अनेक कक्ष नव्याने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त जागा आवश्यक असून मुंबईप्रमाणे नागपूर येथे सेंट्रल हॉलची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन हा परिसर येणाऱ्या काळात विस्तारित करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येथे दिली. नार्वेकर यांनी गेल्या दोन वर्षानंतर हे अधिवेशन होत असल्यामुळे नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील आढावा सर्वप्रथम घेतला. नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली. नागपुरातील विधिमंडळाचा संपूर्ण परिसर तसेच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत असतील. मोर्चे, त्यांचे नियंत्रण, भेटीचे ठिकाण, शिष्टमंडळाच्या भेटी याबाबतही त्यांनी माहिती दिली. महिला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त आमदार निवासात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी अधिवेशनासाठी दहा हजारावर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतील.


यावेळी प्रामुख्याने सभागृहातील आतील सुविधा, सुरक्षा व्यवस्था लोकप्रतिनिधींना सोयी सुविधा आणि सभागृहाच्या कामकाजाच्या वहनासाठी नागपुरात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राहणे, खानपान, वाहतूक, 24 तास अखंड वीज पुरवठा, संपर्क साधण्यांची मुबलक उपलब्धता, टेलिफोनची उपलब्धता, गरम पाण्याची व्यवस्था, रेल्वे आरक्षण, पार्किंगची सुविधा, याशिवाय बाहेरुन येणारे व्हिजिटर्स आणि मोर्चे यांची सुरक्षा तसंच त्यांच्या मागण्या जनप्रतिनिधींपर्यंत सुलभ पद्धतीने पोहोचवण्याची रचना यावरही चर्चा करण्यात आली.


खासगी बस व्यवस्थेवर नजर


विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आतमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी, प्रत्येक मंत्री आणि आमदारांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशिका, विधानभवन परिसरातील महिला सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीची आवश्यक प्रसाधन व्यवस्था, महिला आमदार यांची आमदार निवासातील व्यवस्था, अधिवेशनासाठी विदर्भाच्या दुर्गम भागातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठीच्या बसेसची व्यवस्था, या काळात खासगी बस भाड्यामध्ये वाढ होऊ न देणे, तसेच यावर परिवहन विभागाने नियंत्रण ठेवण्याची सूचना केली. सामान्य नागरिकांसाठी बाहेर उत्तम दर्जाच्या प्रसाधन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था याबद्दलचा आढावा घेतला. सभागृहाप्रमाणे सभागृहाबाहेरही सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनातर्फे करण्यात आलेली वाहन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, संपर्क साधने, पत्रकारांची व्यवस्था याबाबतही स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली. लवकरच मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भातील कालावधी व अन्य महत्त्वपूर्ण घोषणा होतील असेही यावेळी नार्वेकर यांनी सांगितले.


पत्रकारांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त शामियाना


विधानसभा आणि विधानपरिषदेच्या वृत्तांकनासंदर्भात (Reporting) मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधींची संख्या वाढली आहे. माध्यमांचे स्वरुपही बदलले आहेत. त्या तुलनेत सभागृहामध्ये बैठक व्यवस्था अपुरी आहे, हे लक्षात घेऊन सभागृहाबाहेर सभागृहातील सर्व व्यवस्था असणारा शामियाना उभारण्याबाबतची सूचना अध्यक्षांनी यावेळी केली. पत्रकारांच्या वाढत्या संख्येला या आधुनिक सुविधांनी युक्त अशा शामियानामध्ये आतील कामकाजाचे वृत्तांकन करता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी सभागृहाबाहेरील सुविधांसंदर्भात माहिती दिली. पत्रकारांच्या बैठक व्यवस्थेचा मुद्दा संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


ही बातमी देखील वाचा


Shraddha Walkar Murder Case : ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, लोकेशन आणि बेपत्ता झाल्याची तक्रार; 'त्या' 54 हजारांमुळेच झाला आफताबचा पर्दाफाश