पुण्यात आयटी कंपनीतील महिलेला चालत्या गाडीत मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2017 12:16 PM (IST)

पुणे: पुण्यात मगरपट्टा येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला तिच्या सहकाऱ्यानं मारहाण करुन चालत्या गाडीतून फेकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आहे. मगरपट्टा येथील एका आयटी कंपनीत महिला आणि तिचा 25 वर्षीय सहकारी झुबेर पटेल हे नाईट शिफ्ट संपवून आज पहाटे 4.30च्या सुमारास घरी जात होते. या दोघांचेही पूर्वी प्रेमसंबंध होते. काल गाडीतून दोघं एकत्र जात असताना त्यांच्यामध्ये काही कारणातून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, झुबेरनं तिला गाडीतच मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेला गाडीत बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिला चालत्या गाडीत फेकण्याचाही प्रयत्न झुबेरनं केला. पण त्याचवेळी चालकाला हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि त्यानं वेळीच गाडी थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने झुबेर पटेल विरोधात खडकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी झुबेरला अटक केली. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.