मुंबई : मुंबईत भाजप स्वबळावर लढल्यास भाजपला शंभरहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून बांधण्यात आला आहे. उलट युती केल्यास त्याचा लाभ शिवसेनेला अधिक होण्याची चिन्हं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
भाजपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भाजप स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन 100 पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या नेत्यांचा कल आहे.
दुसरीकडे स्वबळावर लढल्यास प्रचारात शिवसेना-भाजपमधील संबंध कमालीचे बिघडतील. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेची मुख्यमंत्री फडणवीस यांना काहीशी चिंता भेडसावत आहे. तरी स्वबळावर लढून निवडणुकांचे निकाल पाहून कल्याण-डोंबिवली प्रमाणे पुढची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
सर्व निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड सुरु असताना सरकार टिकवण्याच्या भीतीपोटी शिवसेनेपुढे नमते घेऊन तडजोड केली, असा ठपका आपल्यावर येऊ नये, याचीही काळजी मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. भाजपचा महापौर जिंकून यावा, यासाठी स्वबळ अजमावून पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा दबाव आहे.
भाजप जर स्वबळावर लढलं नाही, तर जागावाटपात शिवसेनेचा वरचष्मा सहन करावा लागेल आणि महापौर शिवसेनेचाच स्वीकारावा लागेल, असा सूर भाजपमध्ये उमटत आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे नमते घेऊन 100 ते 105 जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्वबळावर लढून निवडणूक निकालानुसार सत्तेसाठीची पुढील रणनीती आखण्याचा मार्ग अधिक योग्य असल्याचं काहीच पक्षात काही नेत्यांचं आहे.