Washim News Update : माजी मंत्री तथा वाशिम काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) उद्या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे देशमुख यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्तेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 


कोण आहेत अनंतराव देशमुख?


अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या राजकारणातील एक उमदं आणि कल्पक नेतृत्व म्हणून अनंतराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. अनंतराव देशमुख हे 1981 ला अकोला युवक काँग्रेस अध्यक्ष होते. 1982 ला अकोला जिल्हा खादी बोर्ड अध्यक्ष होते. शिवाय 1979 मध्ये विदर्भात सर्वाधिक मते घेऊन अकोला जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद सदस्य ते निवडून आले होते. त्यानंतर ते 1985 मध्ये प्रथम विधानसभा सदस्य म्हणून कारंजा मतदार संघातून विजयी झाले. त्यावेळी त्यांनी अर्थ, नियोजन माहिती जनसंपर्क राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. 


अनंतराव देशमुख 1989 आणि 1991 दोन टर्म खासदार म्हणून वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व असलेले अनंतराव देशमुख यांचा एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यावेळी गौरव देखील करण्यात आला होता.  काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, अशा विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केले. 1999 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर देखील त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक काम निरंतर चालू ठेवले. 2009 आणि 2019 ला रिसोड विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष राहून देखील त्यांचा अतिशय कमी मताने पराभव झाला. वाशिम जिल्हा स्थापनेपासून वाशिम जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता ठेवणारे तसेच वाशिम जिल्ह्यातील विविध पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद यावर अनंतराव देशमुखांची सत्ता कायम आहे. 


काँग्रेसचे गॉडफादर म्हणून ओळख


वाशीम जिल्ह्यातील काँग्रेसचे गॉडफादर म्हणून देखमुख यांची ओळख आहे. जिल्ह्यात प्रचंड जनसंग्रह असून तब्बल चार दशकं काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात अनंतराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग गेल्या दीड वर्षांपासून अनंतरावांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा व विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसची घसरण होत असताना पक्ष अनंतराव देशमुखांना सन्मान देईल, अशी अटकळ होती. परंतु, पक्षाकडून कोणतीच हालचाल  न झाल्याने अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.