नागपूर : कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. 56 इंचाच्या छातीचं शौर्य दाखवण्याची हीच खरी वेळ आहे, असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवली.


मोदी सरकारने शर्थीचे प्रयत्न करत कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये झालेल्या शाईफेकीच्या प्रकरणानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

मुंबईत आझाद मैदानात भाजपचं आंदोलन
तर तिकडे मुंबईतील आझाद मैदानात भाजपने पाकिस्तानविरोधात आंदोलन केलं. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून भाजपने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाचा निषेध केला.

पनवेलमध्ये पाक राष्ट्रध्वज जाळून मनसेचा निषेध
पनवेलमध्येही मनसेने पाकिस्तान सरकारचा पुतळा आणि राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त केला. पनवेलच्या गार्डन हॉटेलसमोर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं.

कोल्हापुरातील शिवसेनेकडून पाकिस्तानी राष्ट्रध्वजाची होळी
तर कोल्हापुरातील शिवाजी चौकात शिवसेनेने पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. पाकिस्तानविरोधी घोषणांनी हा परिसर दणाणून निघाला होता.

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा
'रॉ'चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा