शाईफेक प्रकरणाची राहुल गांधींकडून चौकशी
काँग्रेसचे नागपुरातील महत्वाचे नेते सतिश चतुर्वेदी यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी माहिती आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली असल्याचंही सांगितलं जात आहे.
मोहन प्रकाश यांनी अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करुन हे प्रकरण थेट राहुल गांधींपर्यंत पोहचवलं. राहुल गांधींनीही या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अशोक चव्हाणांशी फोनवरुन बातचीत केली, अशी माहिती आहे.
शाईफेक प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर काँग्रेसच्या तीन नाराज नेत्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यापैकी एक जण विद्यमान आमदार आहे. मात्र सध्या केवळ सतिश चतुर्वेदी यांच्यावरच कारवाई होऊ शकते.
शाई फेक करणारा मुख्य आरोपी हा माथाडी कामगार संघटनेचा लीडर असून या सर्व संघटनांचं नेतृत्व सतिश चतुर्वेदी यांच्याकडे आहे.
नागपुरात हसनबाग परिसरात शनिवारी अशोक चव्हाण यांची सभा सुरु असताना तिथे व्यासपीठावर जाऊन ललित बघेल याने अशोक चव्हाण यांच्या आणि काही स्थानिक नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शाई फेकली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
एका कारवाईने काँग्रेसच्या गटबाजीला आळा बसेल?
सध्या नागपूर काँग्रेसमध्ये तिकीट वाटपानंतर नाराजी ही फक्त कार्यकर्त्यांमध्येच नाही तर नेत्यांमध्येही आहे. फक्त शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि त्यांचे नेते विलास मुत्तेमवार यांच्याच कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त तिकीट चव्हाण यांनी दिले, असा काँग्रेसच्या एका गटाचा आरोप आहे.
काँग्रेसमध्ये नुसती नाराजी आहे, असं म्हणून चालणार नाही, तर काँग्रेसमधील गटबाजीनेच नागपुरातील काँग्रेसचा प्राण घेतला हे देखील तेवढंच खरं आहे. याला नागपुरातील प्रत्येक प्रमुख नेता जबाबदार असल्याचं बोललं जातं. त्यामुळे सतिश चतुर्वेदींवर कारवाई केली तर गटबाजीला आळा बसेल, अशी काँग्रेसची आशा आहे.