Ashok Chavan On CM Eknath Shinde:  'फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता' असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केला होता. त्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे (Shiv Sena Vinayak Raut Chandrakant Khaire) यांच्यासह शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर (NCP Congress) सरकार स्थापन्यासाठी पुढाकार घेऊन आलेल्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे हे देखील होते, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडीला आता विरोध करणाऱ्या शिंदेंबाबत चव्हाण यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांकडून अशोक चव्हाणांच्या वक्तव्याला दुजोरा दिला गेला आहे. अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरेंनी दावा करत म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते.


तर विनायक राऊत यांनी यावर बोलताना म्हटलं की, अशोक चव्हाण बोलले ते खरे आहे. भाजपच्या अन्यायावर एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली होती. राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे भाजपच्या जवळ कसे गेले हे इडीचे डायरेक्टर सांगू शकतात.   शिवसेनेतील गद्दारीची कीड रामदास कदम यांनी रुजवली असंही ते म्हणाले.  रामदास कदम हे नारायण राणे यांच्यासोबत जाण्यास तयार होते, असा दावाही त्यांनी केला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, आता हेच सांगतात आम्हाला राष्ट्रवादी नको काँग्रेस नको. तेच त्यावेळी गेले. त्यावेळीस त्यांनी विरोध नोंदवला पाहिजे होता. त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे हे जनता बघत आहे, असंही दानवे म्हणाले. 


अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल


यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, अशोक चव्हाणांची क्लिपच जाहीर केली तर त्यांची अडचण होईल. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल. उद्धव ठाकरेंनी तसं ठरवलं असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील. कारण तेव्हा एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. तेव्हा नेते उद्धव ठाकरे होते. त्यामुळे भाजपसोबत दगाबजीचा तो निर्णय त्यांचा असावा. 2014 असो किंवा 2019 उद्धव ठाकरे यांची इच्छा भाजपसोबत वेगळे होण्याचीच होती.चंद्रकांत खैरे फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक साधण्यासाठी असं बोलत आहेत ते त्यांच्या नजरेत येऊ इच्छितात, असंही बावनकुळे म्हणाले.  


शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी म्हटलं की,  चंद्रकात खैरे हे वयाने ज्येष्ठ असून युवराजांच्या मागे पुढे ते करत होते. त्यांचा तोल ढासळला आहे.  अशोक चव्हाण यांचा आदर्श सगळ्यांना माहिती आहे. अशोक चव्हाणांबाबत काही इकडे जाणार तिकडे जाणार अशा बातम्या आल्या होत्या. एक संशयास्पद वातावरण निर्माण त्यांच्याभोवती निर्माण झालं होतं.  अशोक चव्हाण त्यांच्याभोवती जे संशयास्पद वातावरण  आहे ते दूर करण्यासाठी हे असं वक्तव्य करत आहेत.  नथेतून तीर मारण्याचा काम अशोक चव्हाण करत आहेत. या वक्तव्याचा काहीही परिणाम एकनाथ शिंदे यांच्यावर होणार नाही, असंही मस्के म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या



अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा; एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते