BJP Leader Ashish Shelar Live : आज एबीपी माझावर दिवसभर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासोबत खास बातचीत करण्यात आली. यावेळी आशिष शेलार यांनी मागील अडीच वर्षात विरोधी पक्ष म्हणून भाजपनं काय काम केलं याचा पाढा वाचून दाखवला. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन अडीच वर्ष झालं आहे. या अडीच वर्षात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने काय कामं केली आहेत याबाबत महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न संबंधित नेत्यांना विचारण्यात आले. खास बातचीतमध्ये शेलार यांनी अडीच वर्षात भाजपनं वेळोवेळी जनतेच्या समस्यासाठी आवाज उठवल्याचं सांगितलं आहे. यावेळी शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आम्हांला विश्वास होता. मात्र सध्याचा नेतृत्वावर आम्हांला विश्वास नाही असं शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबई 26 जुलैचा महाप्रलय आला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. पण शिवसेनेनं मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावलेले नाहीत. 25 वर्ष सत्ता असूनही मुंबईकरांसाठी योग्य उपाययोजना न केल्याने शिवसेनेनं जनतेची माफी मागावी, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
'भाजप अशांतता पसरवण्याचं काम करत नाही. भाजप आणि संघावर आरोप करताना पुरावे द्या अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा', असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. पुराव्यांविना संघ आणि भाजपवर गंभीर आरोप करु नये, असं वक्तव्य करत आशिष शेलार यांनी गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे. काही विरोधक आणि संघ ठरवून राज्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा आरोप गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना शेलार यांनी ही प्रतिक्रिया मांडली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या