आषाढी यात्रेबाबत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा झाली. आषाढी यात्रेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा निघण्याबाबत मानकरी, विश्वस्त व इतर महत्वाच्या 9 जणांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनअंतर्गत शासनाकडून विविध निर्बंध लादण्यात आलेले आहेत. राज्यभरातील अनेक महत्वाची मंदिरं काही दिवसांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठुरायाचे मंदिरही अनेक दिवसांपासून बंद आहे. अशावेळी परंपरेनुसार दरवर्षी निघणारी ज्ञानेश्वर माऊलींची आषाढीची वारी यंदा निघणार की नाही, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.
"आषाढी कार्तिकी विसरु नका मज सांगतासी गुज पांडुरंग..." हे संतवचन जरी प्रमाण असले तरी यापूर्वी 1896 साली प्लेगची साथ आली होती तेव्हा देखील ब्रिटिश सरकारने आषाढी आणि इतर पालखी सोहळे रद्द करुन प्रातिनिधिक स्वरुपाची यात्रा केल्याचं सांगितलं जातं. यंदाचा धोका खूपच मोठा आहे. पंढरपूर परिसरात कोरोनाला अद्याप शिरकाव करता आलेला नसला तरी सोलापूर शहरात कोरोनाचा फास आवळत चालला आहे.
आषाढीसाठी राज्यभरातून जवळपास 150 ते 200 पालखी सोहळे येत असले तरी यात प्रामुख्याने सात मानाच्या पालख्यांचे महत्त्व संप्रदायात असते. याच सात पालख्यांसोबत जवळपास 10 ते 15 लाख वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. या प्रमुख पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे पुणे परिसरातून येतात. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोरोनाचे मोठे संकट असल्याने हा रेड झोन करण्यात आला आहे. याच पद्धतीने संत निवृत्तीनाथ यांची पालखी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथून तर संत एकनाथ महाराजांची पालखी औरंगाबादच्या पैठण इथून येत असल्याने त्यांचीही वाट कोरोनाने अडवून धरली आहे. मानाच्या पालख्यांपैकी सर्वात दुरुन म्हणजेच मुक्ताईनगरमधून संत मुक्ताबाई यांची पालखी येते. तब्बल 750 किलोमीटरचा पायी प्रवास करुन 34 दिवसात ही पालखी पंढरीत पोहोचते.