पंढरपूर :  आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi)  महापूजेसाठी 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत (CM Eknath Shinde)  पूजेचा निर्णयच झाला नसून चुकीच्या बातम्या आल्या, असं स्पष्टीकरण पंढरपूर मंदिर समितीचे (Pandharpur Mandir Samiti)  सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलं. आज झालेल्या मंदिर समिती बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारचं कोणतेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं नसल्याचं सांगत, यंदाची महापूजा देखील मुख्यमंत्री दाम्पत्य आणि मानाचा वारकरी हेच करतील, असंही औसेकर यांनी स्पष्ट केलं. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला आणि असा निर्णय झाला नव्हता तर चुकीची माहिती कोणी बाहेर दिली, यावरुन नवा वाद निर्माण होणार आहे. 


आज आषाढी यात्रेच्या तयारीसाठी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा नावाचं वाद समोर आला . या दहा मानाच्या पालखी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे महापूजेसाठी   पास देण्याची मागणी केली होती . मात्र आषाढी एकादशीला मंदिर हे प्रशासनाच्या ताब्यात असल्याने त्यांचेशी चर्चा करून व मंदिर समितीमध्ये निर्णय घेऊनच या पासची व्यवस्था केली जाणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले . या दहा मानाच्या पालखी प्रमुखांना पूजेच्यावेळी आत जाऊ द्यायचे का असा विषय होता.  महापूजेत सहभागी होण्याचा नसल्याचा खुलासा औसेकर यांनी केला . या मानाच्या पालखी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला मंदिर समितीला नाही असे सांगत समितीने थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाच एकप्रकारे आव्हान दिले आहे . यामुळे या दहा प्रमुख मानाच्या पालखी सोहळ्यांना नेमका काय शब्द दिला यावर आषाढी पूर्वीच नवीन वाद समोर येऊ शकतो. खरतर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री तर समस्त वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून मानाचा वारकरी यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा होत असते . मात्र यंदा 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना पूजेत सहभागी करून घेण्याचा घेतलेला निर्णय यामुळे सरकारच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.


चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे: गहिनीनाथ महाराज औसेकर 


 याबाबत बोलताना दोन वर्षांपूर्वी महापूजेसाठी आदित्य ठाकरे आले असता त्यांनाही गुदमरायला झाल्याचा त्रास झाला होता . सध्या मंदिराचे नव्याने संवर्धनाचे काम होत असून यात नेमके काय होईल याची आम्हालाही कल्पना नसल्याचे सांगत महापूजेच्यावेळी मंदिरात केवळ 60 व्हीआयपी बसू शकत असताना तीनशे ते साडेतीनशे व्हीआयपी आत येतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्वाची असल्याचेही औसेकर यांनी सांगितले. या महापूजेच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोणताही हस्तक्षेप नसून तसे त्यांचे वक्तव्य देखील नसल्याचे सांगत ज्यांनी अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या यावर औसेकर यांनी ठपका ठेवला.  वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले यांनी यासंदर्भात माहिती माध्यमांना दिली होती. औसेकर यांच्या खुलाशानंतर अक्षय महाराज भोसले यांच्यावर उघडपणे मंदिर समितीने रोष व्यक्त केला .या महापूजेसाठी आमची अडचण नाही ना पालखी प्रमुखांची अडचण आहे असे सांगत अडचण केवळ जागेची असल्याचा खुलासा औसेकर यांनी केला .


मुख्यमंत्री आणि  मंदिर समिती यांच्यात नवा वाद समोर येण्याची शक्यता


 येत्या अधिवेशनापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेच्या निमंत्रण देण्यासाठी जाणार आहोत त्यावेळी या सर्व गोष्टी त्यांना सांगू असे औसेकर यांनी सांगितले . आता मंदिर समितीच्या या भूमिकेनंतर मानाचे दहा पालखी सोहळा प्रमुखांची भूमिका महत्वाची ठरणार असून जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला असेल तर आता हा मंदिर समिती आणि मुख्यमंत्री यांच्यातील अधिकाराचा प्रश्न पुढे येणार आहे .  मूळ या 10 प्रमुख मानाच्या पालखी सोहळ्यांना महापूजेसाठी पास देण्याबाबतही मंदिर समिती मध्ये निर्णय केला जाईल असे सांगितल्याने मानाचे पालखी सोहळे , मुख्यमंत्री आणि तीन वर्षांपूर्वी मुदत संपलेली मंदिर समिती यांच्यात नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे . 


हे ही वाचा :


'आषाढी वारी'साठी यंदा ST थेट तुमच्या गावात, 5000 जादा बसेस सोडणार; फुकट्या प्रवाशांनाही चाप बसणार