नागपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं पाठबळ आहे. शरद पवार यांनी नेहमी मराठा राजकारण केलं, ते ओबीसीविरोधी आहेत. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार (Sharad Pawar) आणि राजेश टोपे त्यांना भेटायला गेले होते. याउलट ओबीसी आंदोलन (OBC Reservation) सुरु झाल्यानंतर तिकडे कोणीही फिरकले नाही, असे वक्तव्य भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केले. ते शनिवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी परिणय फुके यांनी शरद पवार हेच मनोज जरांगे यांना पाठबळ पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला. शरद पवार हे ओबीसीविरोधी आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे, हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही. उलट त्यांच्याविरोधात भूमिका घेतली, असा आरोप परिणय फुके यांनी केला.


मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली. त्यासंदर्भात जीआर निघाले, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले. मनोज जरांगे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करतात. राज्यातील 60 टक्के ओबीसी समाजाला अगोदरच अत्यल्प आरक्षण मिळत आहे. त्यासाठी ओबीसी संघटना म्हणून आम्ही शेवटपर्यंत लढू, असे परिणय फुके यांनी म्हटले. 


मनोज जरांगे यांचा आंदोलनामागे वेगळाच हेतू: परिणय फुके


आमची भूमिका नेहमी एकच आहे की, मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, त्यांना ओबीसीतून आरक्षण नको. मनोज जरांगे यांचा काही दुसरा हेतू आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले. यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले आणि ओबीसीतून मिळाले तर राज्यात तेढ निर्माण होईल,हेच जरांगे यांना पाहिजे. 


सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला


जालन्यातली वडगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरु आहे. शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे येथील स्थानिक आमदार आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये राजेश टोपे हे हाके यांच्या भेटीला गेले नव्हते. मात्र, शनिवारी सकाळी राजेश टोपे अचानक वडीगोद्री येथे दाखल झाले. त्यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा केली. ते उपोषणाच्या स्टेजवर फक्त 5 मिनिटं थांबून बाहेर पडले होते. 


आणखी वाचा


सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, स्टेजवर फक्त 5 मिनिटं बसले अन्..