Ashadhi Wari 2023: आषाढी वारीमध्ये तीन नंबरचे महत्वाचे स्थान असलेली श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांची (Sant Eknath Maharaj) पालखी बीड जिल्ह्यात पोहचली आहे. दरम्यान नाथांच्या दिंडीने बुधवारी तांब्याचं राक्षसभुवन या ठिकाणी चौथा मुक्काम केला होता. त्यानंतर दिवसभर प्रवास केल्यानंतर नाथांची पालखी शिरूर तालुक्यात पोहचली आहे. तसेच आजचा प्रवास केल्यावर रात्रीचा मुक्काम शिरूर तालुक्यात रायमोह येथे होणार आहे. त्यानंतर पुन्हा पालखी पंढरपूरच्या दिशने प्रवासाला निघणार आहे. दरम्यान शिरूरमध्ये संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पालखी दाखल होताच ग्रामस्थांनी मोठया उत्साहात स्वागत केले.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा... या अभंगाप्रमाणे वारकऱ्यांची पाऊले पंढरीकडे निघाली असून विठुरायाला डोळे भरून पाहण्याची आस त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दर कोस दर मुक्काम करत राज्यातील सर्व दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहेत. तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत एकनाथ महाराजांची पालखी बुधवारी दुपारी बारा वाजता शिरूर शहरात आल्यानंतर तोफा वाजवून पायघड्या घालून दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी गावाच्या वेशीवर पालखीचे आणि दिंडी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर पालखी शहरातील भाविकांसह पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी मारुती मंदिरात ठेवण्यात आली. शहरात ठिकठिकाणी चहा, पाणी आणि केळीचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच कालिकादेवी मंदिरात आसाराम दगडे, माऊली काटकर यांनी सामुहिक फराळाची व्यवस्था केली होती. तीन वाजता दिंडीचे पालखीसह प्रस्थान झाले. या वेळी शहरातील महिला, आबालवृद्ध जिजामाता चौकापर्यंत दिंडीला मार्गस्थ करण्यासाठी उपस्थित होते.
आजचा प्रवास कसा असणार...
संत एकनाथ महाराज यांची पालखी सद्या बीड जिल्ह्यात आहे. काल बुधवारी (14 जून) रोजी राक्षसभुवन येथे मुक्काम केल्यावर आज पुन्हा दिंडी पंढरपूरच्या दिशने प्रवासाठी निघाली आहे. ज्यात सकाळचा विसावा राक्षसभुवन येथे असून असणार असून, सकाळचा दुसरा विसावा विघनवाडी येथे असणार आहे. तर दुपारचा विसावा खोल्याची वाडी येथे असणार असून, दुपारचा दुसरा विसावा सांगळवाडी येथे असणार आहे. तर तर आजचा मुक्काम शिरूर तालुक्यातील रायमोह गावात असणार आहे.
पाच रिंगण सोहळे होणार...
पैठण ते पंढरपूर दिंडीदरम्यान प्रवासात पाच 'रिंगण सोहळे' होणार आहे. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडले आहे. तर पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे 'रिंगण सोहळा' पार पडणार आहे. तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23 जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27 जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :