Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि (Ashadhi Wari 2023 ) संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी दिवेघाटातील महत्वाचा टप्पा पार केला आहे.  ज्ञानोबा माऊलींनी सासवडमध्ये विसावा घेतला आहे तर तुकोबारायांच्या पालखीने यवतमध्ये विसावा घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा मुक्काम सासवडला असणार आहे तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे. या दोन्ही पालख्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत तर गावकऱ्यांनीदेखील वारकऱ्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आहे.


सासवड आणि यवतमध्ये दोन्ही पालख्यांची गावकऱ्यांनी सेवा केली. वारकऱ्यांच्या भोजनाची सोय आणि त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी केंद्रदेखील उभारण्यात आले होते. सासवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांनी आपल्या राहोट्यांमध्ये वारकऱ्यांनी विसावा घेतला होता. रात्री अनेकांनी भजन आणि अभंगाच्या ओळी गायल्या. यावेळी शहराला प्रसन्नदायी वातावरण प्राप्त झालं होतं. 


ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवडमध्ये माऊलीला निरोप देताना पालखी ही जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावर आणण्याची प्रथा आहे. उद्या (16 जून) सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होईल लाखो वारकऱ्यांचा मेळा जेजुरीच्या मार्गाने लागेल. त्यानंतर जेजुरीकरांकडून दरवर्षी प्रमाणे पालखीचं स्वागत करण्यात येईल. जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष होईल. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली असते. सासवडहून निघालेल्या माऊलीच्या पालखीसोबतचे वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचतील. 


पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपांचे वाटप


जिल्हाधिकारी पुणे यांचे संकल्पनेतून आणि मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक पुणे यांच्या  मार्गदर्शनाखाली महसूल आणि वन विभागाच्यावतीने हरितवारी अभियानांतर्गत पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपे, बीजगोळे आणि बीया वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे अभियान पालखी मार्गावरील वन परिक्षेत्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असून भांबुर्डा व पुणे वनपरिक्षेत्रात सासवड वनपरिक्षेत्रात 5 हजार बीजगोळे व 25 हजार बीया वाटप करण्यात आल्या.  तसेच मौजे लोणी काळभोर येथे 50 वारकऱ्यांमार्फत 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमास वारकरी संप्रदायाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.वनविभागाकडून पालखी विसाव्याच्या ठिकाणांवर देहुगाव, आळंदी, जेजुरी, वाल्हे, नीरा, लोणंद, फलटण,  बारामती,  बेलवाडी रिंगण, वालचंदनगर व नातेपुते येथे  वारकऱ्यांना बीज, बीजगोळे, रोप वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.