Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी शेगावहून पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराज पालखीने आज उस्मानाबाद शहरात प्रवेश केला. यावेळी भक्तीभावाने विठ्ठल नामाच्या गजरात पांडूरंगाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे, पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. जिल्ह्याच्या सिमेपासून भक्तांनी मनोभावे पालखी सोहळ्याचे स्वागत केले. भक्तीभावाने पंढरीकडे निघालेला हा पालखी सोहळा आज उस्मानाबाद येथे मुक्कामी असुन उद्या सकाळी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे. पायी पालखी सोहळ्याचे 53 वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे चौदस पर्यंत मुक्काम असतो. काला करून श्रींची पालखी पौर्णिमला परतीच्या प्रवासाला सुरुवात करते भक्तीभावाने, उत्साही वातावरणामध्ये पालखीचे स्वागत केले जाते.   


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीत मुक्काम 


जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने बारामतीत मुक्काम केला आहे. या गावाजवळून जवळच काटेवाडी हे गाव लागतं. काटेवाडी हे शरद पवार यांचे गाव आहे आणि याच गावांमध्ये अगदी वाजत गाजत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत झालं आहे. त्यानंतर गावाच्या वेशीवर पालखी सोहळा पोहोचल्यानंतर परीट समाजाच्या वतीने पालखीच्यासमोर धोतराच्या पायघड्या टाकण्याची मोठी परंपरा या ठिकाणी आहे. 


तीन वर्षांत पंचक्रोशीत पहिल्यांदाच गावकऱ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा 


मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण सोहळा अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते. सुरुवातीला विणेकरी, टाळकरी आणि त्यानंतर मृदंगवाले, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांनी अगोदर प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचे अश्व याच ठिकाणाहून धावले आणि एकच ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष झाला.


सातारा जिल्हा परिषदेमार्फत वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी 200 आरोग्य दूतांची व्यवस्था 


आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांत वयोवृद्ध वारकऱ्यांचा मोठा सहभाग असतो. म्हणून या वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी सातारा जिल्हा परिषदेने 200 आरोग्य दूत नेमले आहेत. विशेष म्हणजे, मोटरसायकलवरून हे आरोग्य दूत वारकऱ्यांकडे जाऊन त्यांना आरोग्यविषयक तक्रारीची नोंद घेतात. आणि त्यावर प्रथमोपचार करतात. 


बालेवाडीतील रिंगण सोहळ्यात पोलिसांचाही सहभाग    


आज बालेवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडले. या गोल रिंगण सोहळ्याच्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा वेगवेगळे वारकऱ्यांच्या खेळ खेळत वारकऱ्यांसोबत सहभाग घेतला. एरव्ही खाकी गणवेशातले पोलीस हे आपापल्या ड्युटीवर असतात. मात्र, आषाढी वारीमध्ये त्यांनासुद्धा ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत यात सामील होत आनंद मिळताना पहायला मिळाला. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावन घेत ज्ञानोबा तुकोबांच्या तालावर ठेका धरला. 


महत्वाच्या बातम्या :