Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळाही 13 जूनला झाला. हरिनामाचा गजर करीत पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज कळंब येथे मुक्काम 


शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम कळंब या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी गोविंदपूर येथून प्रस्थान करेल तर रात्री पालखीचा मुक्काम तेरणा साखर कारखाना येथे असणार आहे. 


माता रूक्मिणीच्या पालखीचा आज पळसखेड, ता. केज, जि. बीड येथे मुक्काम 


माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री पळसखेड, ता. केज, जि. बीड येथे मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी 28 जून रोजी ही पालखी सकाळी पळसखेड, ता. केज, जि. बीड येथून प्रस्थान करेल. तर, रात्री विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 


संत मुक्ताईच्या पालखीचा आज मोरगाव येथे मुक्काम


यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी मोरगाव मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी 28 जून रोजी ही पालखी वानगांव येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम चौसाळा या ठिकाणी असणार आहे. 


संत निवृत्तीनाथ पालखीचा आज घोगरगांव येथे मुक्काम 


संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज घोगरगांव मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 28 जून रोजी पालखी सकाळी घोगरगांव येथून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री मिरजगांव येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे. 


संत नामदेवांच्या पालखीचा आज परळी वैजनाथ येथे मुक्काम 


दोन वर्षांनंतर पालखीच्या सोहळ्याने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमली आहे. भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराज (Sant Namdeo Maharaj) यांची पालखी 19 जून रोजी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा आजचा मुक्काम परळी वैजनाथ येथे असणार आहे तर, उद्या म्हणजेच 28 जून रोजी पालखी परळी वैजनाथ येथून प्रस्थान करेल तर पालखीचा रात्रीचा मुक्काम अंबेजोगाईत असणार आहे.   


संत तुकारामांच्या पालखीचा आज उंदवडीत मुक्काम


विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज उंदवडीत मुक्काम असणार आहे. तर, उद्या म्हणजेच मंगळवारी 28 जून रोजी पालखी उंदवडी गवळ्याची येथून प्रस्थान करेल. पालखीचा रात्रीचा मुक्काम बारामती गावी असणार आहे. 


संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज वाल्हे येथे मुक्काम 


विठूनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निगाल्या आहेतत. त्यानुसार पालखीचा आजचा मुक्काम वाल्हे येथे असणार आहे. तर, उद्या पालखी वाल्हे येथून प्रस्थान करेल. तर, रात्रीचा मुक्काम लोणंद या ठिकाणी असणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :