Ashadhi Wari 2022 Palkhi Updates : विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. काल पुण्यातून सासवड येथे पोहोचलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये बंधू सोपानकाकांच्या भेटीसाठी दाखल झाली असून आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. संत तुकाराम महाराजांची देहू वरून निघालेली पालखी पुण्यात आल्यानंतर हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे पोहोचली. आज सकाळीच लोणी काळभोरमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा यवतमध्ये असणार आहे


यावर्षी होणारे हे दोन्ही पालखी सोहळे संपूर्णपणे निर्बंध मुक्त असल्याने मोठ्या प्रमाणात लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसऱ्याप्रमाणे गावागावात आणि चौका चौकात या पालख्यांचं अतिशय उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत होताना पाहायला मिळतय. तर या वारीत चालवणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजारो हात राबत आहेत.


आज सासवडमध्ये माऊलीची पालखी मुक्कामी तर सोपानकाकांच्या पालखीचं होणार प्रस्थान..


परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीनंतर आज दुपारी बारा वाजता सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यासाठी देवस्थानच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून आज दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत..


सोपानकाकांच्या सासवडमध्ये वारकरी विसावले..


कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले सासवड म्हणजे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेला प्रदेश. आकाशाला भेदून ताठ मानेने उभ्या असलेल्या कऱ्हा काठच्या उंचच्या उंच डोंगररांगा. हिरवेगार मळे आणि दाट झाडीत वसलेले सासवड हे वारकऱ्यांसाठी दोन दिवस विसाव्यांचे ठिकाण. एका दिवसात तब्बल 28 किलोमीटरचा अंतर चालून आलेले थकले भागलेले वारकरी याच सासवड मुक्कामी थांबत आहेत.


पुरंदरचा हा कऱ्हा पठार जशी आध्यात्मिक अधिष्ठान असलेली पवित्र भूमी आहे. त्या बरोबरच पावलो पावली दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या जिगरबाज लढवय्यांची ही भूमी आहे. बोलीभाषा पासून ते मराठी साहित्याची ज्यांनी जडण घडण केली त्या प्र.के अत्रेंचे गाव म्हणजे सासवड.. पुरंदरच्या या कऱ्हा पाठरात सात गड आणि नऊ घाट आहेत. या गडाच्या पायथ्याशी आणि घाटाच्या माथ्याशी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.


माऊलींची पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते तिथे पालखी तळ बनवण्यात आलेले आहेत. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गामध्ये अनेक पालखी तळ हे आता शहरांमध्ये किंवा गजबजलेल्या वस्तीमध्ये अल्याने अनेक वेळा भक्तांबरोबरच बऱ्याच वारकऱ्यांची ही अडचण होत आहे.. या पालखी मार्गातील सर्वात सुसज्ज आणि विस्तीर्ण असा पालखी तळ सासवडमध्ये बनवण्यात आलाय.. या पालखी तळाला चोहु बजावून कंपाउंड बनवण्यात आल्याने कितीही गर्दी झाली तरीही त्यावर नियंत्रण ठेवणं हे प्रशासनाला शक्य झालं आहे..


सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी


ब्रम्हांड पंढरी सोवळी हे खरी


तरसी निर्धारे एक्या नामे


सोपान सकळ सोवळा प्रचंड


नुकसान बोले वितंड हरिवीण..


 
सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानकाकांची संजीवन समाधी आहे. सासवड मुक्कामी येणारे वारकरी हे सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.. सासवडमध्ये माऊली आणि सोपान काकाची भेट झाल्यानंतरच सोपान काका ची पालखी प्रस्थान ठेवायची म्हणजे माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतरच सोपान काकाची पालखी हे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवत असत.. इथून पुढे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे हे भावंडे पुढे टप्प्या वरच एकत्र येतात.


छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला तो पुरंदर किल्ला सासवड पासून अवघ्या आठ किलोमीटरवर आहे. याच सासवड मध्ये वीर बाजी पासलकरांची समाधी आहे. भोगवती आणि कऱ्हा नदीचा संगम याच भूमीत झाला. कऱ्हा काठावरील 52 सरदारांनीच पेशवाई वाढवली. त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आज ही या ऐतिहासिक भूमीमध्ये पाहायला मिळतात.


आज सासवडमधून सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यामध्ये शंभरेक दिंड्या सहभागी झालेले आहेत.. सोपान काकाच्या प्रस्थाना वेळी सासवड पंचक्रोशीतील अबालवृद्ध एकत्र जमतात.. माऊलीच्या पालखी तळावरती भरलेला बाजार तर कोणत्याही जत्रे पेक्षा नक्कीच कमी नाही