CM  Uddhav Thackeray on Kharif Season : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM  Uddhav Thackeray) यांनी केलं. पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबत कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. 

Continues below advertisement

 राज्यात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी 

राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. सध्या राज्यात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच सुमारास 23 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिली. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी 25 जून ते 1 जुलै हा 'कृषी संजीवनी सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावांगावामध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही डवले म्हणाले. 

Continues below advertisement

लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्या

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे  दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा  याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका , ती तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

वारकऱ्यांची काळजी घ्या

आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती  देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारीत वारकरी मंडळी देहभान हरपून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करण्यात यावी. विशेषतः मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा याबाबतीत जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच अन्य विभागांचे सचिव उपस्थित होते.