Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? तसेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


 संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज श्रीक्षेत्र डव्हा येथे मुक्काम 


शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यात आगमन झाले. 6 जूनला शेगाव येथून निघालेल्या या पालखीचे अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रस्थान झाले. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम श्रीक्षेत्र डव्हा नंगेनाथ महाराज यांच्या मंदिरास्थळी होणार आहे. उद्या पालखी वाशिम येथील मालेगांवच्या शिरपूर मुक्कामी असणार आहे. त्यानंतर पालखी मजल दरमजल करत वाशिमच्या रिसोड मार्गे हिंगोलीकडे रवाना होणार आहे. 


माता रूक्मिणीच्या पालखीचा आज बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड येथे मुक्काम 


माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज सकाळी रामनाथ स्वामी संस्थान, धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशिम येथून पालखीचे प्रस्थान झाले. तर, आज रात्री बारालिंग मंदिर, (ता. कारंजा लाड, जिल्हा वाशिम) येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच सोमवारी 12 जून रोजी ही पालखी सकाळी बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान करेल. तर, रात्री पोघात, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 


संत मुक्ताईच्या पालखीचा आज खंडाळा मकरध्वज येथे मुक्काम


यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज दुपारी चिखली येथे पालखीचे प्रस्थान असणार आहे. तर, खंडाळा मकरध्वज या ठिकाणी रात्री पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच सोमवार 13 जून रोजी ही पालखी कोलारा येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम मेरा बु. या ठिकाणी असणार आहे. 


संत रुपलाल महाराज पायी पालखीचे रथासह पंढरपूरसाठी प्रस्थान


अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे "पुंडलिक वरदे हरि विठ्ठल......श्री ज्ञानदेव तुकाराम" संत रुपलाल महाराजांच्या जयघोषात संत रुपलाल महाराज पायी पालखी सोहळा अंजनगाव सुर्जी येथून पालखीने शुक्रवारी 10 जून रोजी सकाळी 9.30 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. संत रुपलाल महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असणार आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांमध्ये संत रुपलाल महाराज पालखी सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. कारण, पंढरपूरमध्ये लांब अंतरावरून येणाऱ्या पालख्यांमधली ही एक पालखी आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी तब्बल 30 दिवस 750 किलोमीटरचा पायी प्रवास करतात. त्यामुळे इतर पालखी सोहळ्यांपेक्षा ही पालखी लवकर पंढरपूरकडे मार्गस्थ होते. या पालखी सोहळ्याच्या परंपरेला 27 वर्ष पूर्ण होत आहेत.


आगामी पालखी सोहळे :


20 जून : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा


21 जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा


महत्वाच्या बातम्या :