दुग्धाभिषेक आणि विविध लेप लावून पांडुरंगाच्या मूर्तीला स्नान घालण्यात आलं. त्यानंतर दोन्ही मूर्तींना सुंदर वस्त्र परिधान करण्यात आली. तुळशीहार आणि फुलांच्या माळांनी विठुरायाला सजवण्यात आलं. खास अलंकृत दागिने आणि वस्त्र घालून विठ्ठल-रुक्मिणीची पूजा संपन्न झाली. विठ्ठलाच्या ओढीने महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून जवळपास 15 लाख वारकरी भाविक विठूरायाच्या पंढरीनगरीमध्ये दाखल झाले आहेत.
अहमदपूरच्या दाम्पत्याला पूजेला मान
या पूजेत वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बसण्याचा मान लातूरमधील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि प्रयागाबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला. गेली 20 वर्षे हे दाम्पत्य वारी करत आहे. महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपस्थित मंत्र्यांचा, आमदरांचा आणि खासदारांचा सत्कार करण्यात आला. मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला.
मुख्यमंत्र्यांच्या हाती टाळ तर अमृता फडणवीस यांच्या डोक्यावर तुळस
शासनाच्या पर्यावरणाची वारी , पंढरीच्या दारी या कार्यक्रमाचा समारोप आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमधील विश्रामगृहावर पार पडला. यावेळी या संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छतेचे अभियान चालवणाऱ्या दिंडीकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. स्वच्छतेची गीते सादर केल्यानंतर वारकरी अभंग सुरु होताच मुख्यमंत्र्यांनी या इतर वारकऱ्यांसमवेत हातात टाळ घेत भजनात रंगून गेले तर त्यांच्या पत्नी अमृता यांनी डोक्यावर तुळसी वृंदावन घेत महिला वारकऱ्यांमध्ये सामील झाल्या.
याआधी महिला आयोगाकडून आणलेल्या नारी शक्ती या चित्ररथाच्या समारोपही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. यानंतर नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत जलप्रदूषणाची जनजागृती करणारी माहितीपट मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आली.