पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन महापूजा केली. विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मंदिरात जाऊन रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली. पंढरीत विठूरायाच्या दर्शनासाठी अलोट जनसागर लोटला आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वारकऱ्यांनी विठूरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. लाखो भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळवून देण्यासाठी मंदिर समिती सज्ज आहे. विठूरायाच्या महापुजेसाठी बुलडाण्याचे मेरत दाम्पत्य मानाचे मानकरी ठरले. सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र गावातील मेरत दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेत सहभागी झाले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं साकडं मागितलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती दे असं मागणं मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी मागितलं आहे. तसंच वारकऱ्यांना मंदिर समितीमध्ये स्थान देण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

शासकीय महापूजनेंतर झालेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागेला आणि विठूरायाच्या पंढरीला निर्मल करण्याचं आश्वासन दिलं.