पंढरपूर : विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषीप्रदर्शनाचं उद्घटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते आज पंढरपुरात बोलत होते. यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ''निलंग्यात हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघाताच्या आदल्या दिवशी मी एका गावात कीर्तनाला गेलो. तिथल्या कीर्तनकारांनी मला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती मला भेट दिली होती. दुसऱ्या दिवशी ती मूर्ती घेऊन मी प्रवासाला निघालो होतो. पण त्यादिवशी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात हेलिकॉप्टरमधील सर्व साहित्याचं नुकसान झालं. पण विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला थोडाही धक्का लागला नव्हता. त्यामुळे त्या विठ्ठलाच्या कृपेनं या अपघातात मी वाचलो,'' अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लातूरमधील निलंग्यात 25 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच ते कोसळलं होतं. यात मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सगळे जण या अपघातातून थोडक्यात बचावले होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल नुकताच एएआयबीने दिला आहे. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं हे समजण्यात पायलटची चूक झाली. शिवाय उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत, असं एएआयबीने अहवालात म्हटलं आहे.