मनमाड : केंद्र सरकारने द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त जल्लोष करण्यापेक्षा मराठवाड्यातील आत्महत्यांकडे लक्ष द्यावं असा सल्ला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. मनमाडमध्ये झालेल्या जाहीर सभेत ओवेसींनी हे वक्तव्य केलं.

 
मराठवाड्यात 4 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे मात्र सरकारचं लक्ष नाही, अशी टीका ओवेसींनी केली. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटून आलेल्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी माफी मागणार का असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मनमाडमध्ये पक्षबांधणीसाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.

 
सरकारने 1 कोटी 20 लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात फक्त 1 लाख रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा ओवेसींनी केला. आगामी काळात एमआयएम महाराष्ट्रातील प्रत्येक गावात संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचंही ते म्हणाले.