Cotton Planting : नंदुरबार : यंदा कापसाला विक्रमी दर मिळाल्याने राज्यातील कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात कापसाची लागवड केली जात असते. त्यात एकूण लागवडीच्या 20 टक्के हिस्सा हा पूर्व हंगामी कापसाच्या लागवडीचा असतो. मात्र यावर्षी राज्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.


राज्यातील बागायतदार शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाची लागवड करत असतात या लागवडीला पूर्वहंगामी कापूस लागवड असे म्हणतात मात्र यावर्षी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात बियाणे एक जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणे विक्रते एक जूनला बियाण्यांच्या विक्रीला सुरुवात करणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असूनही शेतकऱ्यांना पूर्व मोसमी कापसाची लागवड करणे शक्य नसल्याचे दिसते. परंतु यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे योग्य बियाण्याचे नियोजन करण्यासाठी तसेच वाढत्या तापमानामुळे कापसाच्या पूर्वहंगामी लागवडीत अनेक धोक्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने दिली जात आहे.


वर्ध्याच्या सेलू उपबाजारपेठेत कापसाच्या भावात प्रचंड तेजी
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू इथल्या उपबाजारपेठेत शुक्रवारी (13 मे) पांढऱ्या सोन्याच्या भावाने विक्रमी उसळी घेत 14 हजाराचा पल्ला पार केला. पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस 14 हजार 470 रुपये दराने खरेदी करण्यात आला. सेलूमध्ये शुक्रवारी तब्बल 400 क्विंटल कापसाची आवक झाली असून तब्बल 9 हजार 700 ते 14 हजार 470 इतका भाव मिळाला. या वर्षीच्या कापसाला प्रति क्विंटलसाठी मिळालेला हा दर सर्वाधिक आणि विक्रमी दर ठरला, अशी प्रतिक्रिया उमटत असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं.


हंगाम संपत आला तरी, सेलू मार्केट यार्डमध्ये कापसाची आवक सुरुच आहे. बाजारपेठेत कापसाला भावही भरपूर मिळत आहे. गुरुवारी 12 मे रोजी कापसाला 13 हजार 845 भाव मिळाला होता. इथल्या बाजारपेठेत लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी होत असल्याने कापसाला चांगला दर मिळत आहे. सेलू शहरातील कापूस बाजारपेठेत सर्वात जास्त भाव मिळत असल्याने बाजूच्या जिल्ह्यातील आणि बाहेरील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी येतो.