यवतमाळ  : जगातील सर्व साहित्यिकांना मराठीची दारे खुली आहेत. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळ्यावेगळ्या लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समाचार घेतला आहे. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले.


हे व्यासपीठ एकमेकांकडे बोट दाखविण्याचे नाही. जगातील सर्व साहित्यिकांना मराठीचे व्यासपीठ खुले आहे. संमेलनामध्ये साहित्यबाह्य कारणांनी वाद होणे चुकीचे आहे. आपला विवेक जागृत ठेवण्याची ही वेळ आहे. निमंत्रणामागच्या हेतूंना आता राजकीय रंग आला आहे, असेही ढेरे म्हणाल्या. कुणीही यावे आणि साहित्य संमेलन वेठीला धरावं हे चालणार नाही, अशा शब्दात अरूणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर खडेबोल सुनावले. निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळींची चूक आहे असेही ढेरे यांनी म्हटले.

जगातील सर्व साहित्यिकांना मराठी साहित्याची दारं खुली आहेत. आपल्याकडे डोंगराएवढं काम केलेल्यांची परंपरा आहे. मात्र अशी माणसे आणि त्यांचं काम विस्मृतीत गेलं आहे असंही ढेरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. विचारवंतांनी कायम सावध राहणं गरजेचं आहे. इतिहास मोठा आहे अभिमास्पद आहे मात्र वेदनादायी आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्य महत्त्वाचं आहे माणूस आणि माणुसकी मोठी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

कलावंत आणि साहित्यिकांच्याबाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे. कोणत्याही तत्त्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते. साहित्यिकाशी बांधिलकी त्याच्या जगण्याशी असते. कलेच्याद्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो असेही मत ढेरे आपल्या भाषणात म्हणाल्या.

आपला विवेक जागृत ठेवायला हवा, सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्या इथे आल्या असत्या तर त्यांचे विचार आपल्याला समजू शकले असते. आता त्यांचे भाषण आपल्याला मिळाले आहे मात्र त्या कशाप्रकारे आवाज उठवतात, त्यांनी काय काय अनुभव घेतले आहेत? हे आपल्याला ऐकायला मिळालं असतं असंही ढेरे म्हणाल्या.

आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात
नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनअध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला आहे. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करतो आणि भाषणाला सुरूवात करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

मी उदास आहे, चिंतित आहे, या प्रकरणाने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. मी निमंत्रण वापसीचा निषेध करतो, असे म्हणत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांच्या नियोजित भाषणाचा एक उतारा वाचून दाखवला. भारतात जे काही वातावरण सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे साहित्यिक कलाकार यांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे देशात असहिष्णुता निर्माण झाली आहे. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे अशी घणाघाती टीका  देशमुख यांनी केली. नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचा मी निषेध करतो या संपूर्ण प्रकरणात महामंडळ कमी पडलं असंही मत देशमुख यांनी व्यक्त केलं.

यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला भाव दिले पहिजे, असेही ते म्हणाले.  यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. नयनतारा सहगल यांच्या विचारांना मी सलाम करतो असे म्हणत लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांचं साहित्यातलं योगदान किती मोठं आहे ते सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या कायम झगडल्या. 1984 मध्ये शिखांचं शिरकाण झालं तेव्हाही त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रातील थोर विचारवंतांची हत्या झाली त्याचाही नयनतारा सहगल यांनी निषेध केला असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. दादरी येथील अश्पाक हत्याकांडांचा निषेध म्हणूनही त्यांनी पुरस्कार वापसी केली. नयनतारा सहगल या बाणेदार शैलीच्या आहेत. कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी जसा आणीबाणीविरोधात आवाज उठवला होता, तसाच आवाज समाजातल्या अन्यायाविरोधात सहगल यांनी उठवला आहे. पाहुण्याला बोलवायचं आणि मग येऊ नका म्हणायचं हे चांगलं झालेलं नाही यासाठी मी चिंतेत आहे.

देशाला आणि महाराष्ट्राची सहिष्णू परंपरा लोप पावते आहे का? असाही प्रश्न मला यामुळे पडला. भारतात आपण धार्मिक विविधता आहे तरीही ऐक्य आहे मात्र ही गोष्ट आपण मागे सोडतो आहोत का? अशी चिंता सहगल यांनी म्हटलं होतं. त्यांची ही खंत योग्यच आहे असेही देशमुख यांनी म्हटले आहे.