मुंबई : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्चून विमानातून धूर काढला, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. लाकूड आणि टायर जाळून धूर काढून कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे.

टायर आणि लाकूड जाळून हा प्रयोग केला जाणार असल्याने यामुळे प्रचंड प्रमामात हवा प्रदूषण होणार आहे. पण हा शास्त्रीय प्रयोग असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. पर्यावरणप्रेमी मयुरेश प्रभुणे यांनी सोशल मीडियावरुन या प्रयोगावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

“नैसर्गिकरीत्या पाऊस पडणे अपेक्षित असताना कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यासाठी 1024 गावांमधून एकाचवेळी हजारो क्विंटल लाकूड आणि टायर जाळून वातावरणात प्रचंड धूर सोडण्याचा उद्योग (22 सप्टेंबर) सोलापूर जिल्हा प्रशासन करणार आहे. विज्ञानाच्या नावाने चालणार् या वरूणयंत्र या बोगस तंत्रज्ञानाला शासनाचे व्यासपीठ उपलब्ध होतेच कसे हा मोठा प्रश्न आहे. पावसाच्या नावाने हजारो झाडांची शासनातर्फे होणारी कत्तल थांबवण्यासाठी मुंबई आणि सोलापूरमध्ये कोणी पर्यावरणप्रेमी आहेत का? विज्ञानाच्या नावाने शेतकर्यांच्या भावनांशी खेळणार्या बोगस तज्ज्ञांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे का?” असा सवाल मयुरेश प्रभुणे यांनी केला आहे.



सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचं आश्वासन दिलं होतं. अनेक प्रयत्न करुनही याला यश आलं नाही. त्यानंतर आता भीषण हवा प्रदूषण करणारा हा प्रयोग होत आहे. त्यामुळे बुद्धीचा दुष्काळ पडलाय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, आयएएस अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा प्रयोग होतोय.

पाहा व्हिडीओ :