वर्धा : देवळीचे काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा निषेध नोंदवत आमदार  रणजीत कांबळे यांना अटक करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलीय.. 


आमदार रणजीत कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचे कलम लावून अटक करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. कारवाई न केल्यास भाजपच्या वतीनं जिल्हा, तालुका स्तरावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी करत यापूर्वीही अधिकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप खासदार तडस यांनी केला. खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, भाजप प्रदेश महासचिव राजेश बकाने, जिल्हा परिषद सभापतो मृणाल माटे यांची उपस्थिती होती. 


रणजीत कांबळेंविरोधात गुन्हा दाखल


आमदार रणजीत कांबळे यांना चांगलंच महागात पडलं आहे. आमदार रणजीत कांबळे यांच्यावर वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर शहर ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा अधिनियम तसंच कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. देवळी मतदारसंघात आयोजित तपासणी शिबीरावरुन आमदार रणजीत कांबळे यांनी आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.


काय आहे प्रकरण?
देवळी तालुक्यात नाचणगाव इथल्या शाळेत अँटिजन, आरटीपीसीआर चाचणीचं शिबीर आयोजित करण्यात आल होतं. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छायाचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. कोणतीही माहिती न देता हे शिबीर आयोजित केल्यावरुन आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरुन धारेवर धरलं. यावेळी कांबळे यांची जीभ घसरली आणि शिवीगाळ केली. 


रणजीत कांबळेंवर कारवाई करा, मेग्मो संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान आमदार रणजीत कांबळे यांचा महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना म्हणजेच मेग्मोने निषेध केला आहे. या राज्यस्तरीय संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी संघटनेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सोबतच आमदार रणजीत कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी करत, कोरोना काळात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आगामी काळात संघटनेकडून कठोर निर्णय घेतला जाईल आणि याची सर्वस्वी जवाबदारी राज्य सरकारची असेल असा इशाराही दिला आहे.