यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट कापलेले विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी आपण विधानसभा लढणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तोडसाम यांना डावलून भाजपनं माजी आमदार संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिल्याने तोडसाम नाराज आहेत. त्यामुळे तोडसाम बंडखोरीच्या तयारीत आहेत. तोडसाम यांनी बंडखोरी केल्यास संदीप धुर्वेंना ही निवडणूक जिंकणं जड जाण्याची शक्यता आहे.


यवतमाळ जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजपचे पाच आमदार होते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. केवळ उमरखेड या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वाना आहे.

भाजप उमेदवार
यवतमाळ - मदन येरावार
राळेगाव - डॉ अशोक उईके
वणी : संजीव रेड्डी बोदकूरवार
आर्णी - केळापूर - डॉ संदीप धुर्वे

आमदार राजू तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपने नाकारल्याचे बोलले जात आहे. तोडसाम यांचा ठेकेदाराला फोनवरुन खंडणी मागण्याचा कथित ऑडियो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यातनंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीस भर चौकात धकाबुक्की केल्याचा व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकारांमुळेच भाजपने तोडसाम यांची उमेदवारी कायम ठेवली नाही, अशी चर्चा या मतदारसंघात सुरु आहेत.

तिकीट कापल्याने तोडसाम बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे धुर्वे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. नाराज आमदार बंडाचा झेंडा फडकवणार असल्याने पुढे नेमके काय होते? याची सर्वाना उत्सुकता आहे.