'पितृपक्षामुळे काही अडचण आहे का?', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं असता, 'आम्हीच खरे 'पितृ'पक्ष' असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं होतं. मात्र, आता जाहीर होणाऱ्या जागा, त्यात शिवसेनेला १३०च्या आता मिळू शकणारा वाटा आणि महत्वाच्या शहरात एकही जागा न मिळणं, हे पाहता राज्यात व युतीत खरा 'पितृ'पक्ष' कोण? हे भाजपनं दाखवून दिलं आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत मुंबई (३६ जागा) वगळता मुख्य शहरांमधील २९ जागांपैकी शिवसेना फक्त ६ तर भाजप २३ जागा लढविणार आहे. ही सर्व शहरं वाढत्या लोकसंख्येची आहेत. यातील अनेक ठिकाणी भाजप महापालिकेत सत्तेवर आहे. पुणे, नागपूरमध्ये तर नगरसेवक-आमदार-खासदार असे सगळेच भाजपचे आहेत. या स्थितीत शिवसेनेसाठी फक्त ही निवडणूकच नव्हे, तर अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागू शकतो. राज्यातील युतीत धाकटेपणा आला असताना आता शहराशहरातही भाजपचं थोरलेपण सेनेला मान्य करावं लागू शकतं.
शहर एकूण जागा सेना भाजप
मुंबई 36 19 17
ठाणे 04 03 01
पुणे 08 00 08
नाशिक 03 00 03
नवी मुंबई 02 00 02
नागपूर 06 00 06
औ.बाद 03 02 01
कोल्हापूर 02 01 01
एकूण 64 25 39