Maharashtra Lockdown Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला नसल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "शरद पवारांचा दररोज सर्वांशी संपर्क असतो. त्यांना सध्या वाढत असलेली जी परिस्थिती आहे, काल (बुधवारी) 25 हजारांच्या आसपास राज्यात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. उद्या कदाचित 35 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होईल, असं आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. त्यासंदर्भात त्यांना अधिक माहिती घ्यायची होती. त्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सध्याची परिस्थिती, त्यावरचा उपाय आणि काय निर्बंध लादले जाऊ शकतात याबाबत चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी सेवांमुळे जर संख्या वाढत असेल, तर त्याबाबतीतले निर्बंध अधिक वाढवण्याची गरज असेल, तर ते करावे, अशा संदर्भातील चर्चा झाली."
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणताच विचार नाही, अशी माहिती दिली. तसेच तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चारही आरोग्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना केला.
"सार्वजनिक कार्यक्रम, लग्नं यासंबंधीच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. करोनाची रुग्णसंख्या नियंत्रित कशी करता येईल यासंबंधी शरद पवारांनी माहिती घेतली. शरद पवारांनी आरोग्य विभागाकडून परिस्थिती समजून घेतली. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि नाही कराव्यात यासंबंधी माहिती घेतली.", असं राजेश टोपेंनी सांगितलं.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या दररोज चर्चा : आरोग्यमंत्री
"मुख्यमंत्री आणि शरद पवार रोज चर्चा करतातच. रोज सकाळी 7 वाजता त्यांची फोनवर सविस्तर चर्चा होते. यामुळे त्यांना निर्णय घेण्यासही मदत होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अधिकची माहिती घेतली असल्याचं, राजेश टोपे यांनी सांगितलं. योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि शरद पवार चर्चेतून घेतील आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करु असंही ते म्हणाले. लसीकरण वाढवलं पाहिजे यावर एमकत झाल्याची माहितीही यावेळी राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार?
आरोग्य मंत्र्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "या सर्व पर्यायांवर चर्चा झाल्या आहेत, मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील."