जालना : युतीच्या घोषणेनंतर शिवसेना आणि भाजपमधील अनेक नेते आणि मंत्र्यांची चांगलीच गोची झाली आहे. त्यात आघाडीचं नाव अर्जुन खोतकर यांचं आहे. अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकत आगामी निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.


स्वबळाच्या नाऱ्यानंतर येत्या निवडणुकीत जालन्यात रावसाहेब दानवेंना आस्मान दाखवू असं सेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं. पण युतीनंतर आता ही जागा भाजपला मिळणार आहे. मात्र तरीसुद्धा दानवेंविरोधात लढण्यावर खोतकर ठाम आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत याविषयी बोलू असं म्हणतानाच आपले इतर पक्षांमध्येही मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असंही खोतकरांनी आवर्जून म्हटलं. शिवसेना-भाजपने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.