मुंबईमाजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर आणि राजेश नितुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला यावेळी बोलताना लातूरमध्ये मोठं नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकरांनी नेहमीच मूल्यावर आधारित राजकारण केलं आहे. त्यामुळे लातूरमध्ये भाजपला मोठं नेतृत्व मिळालं असून सुधाकरराव शिंगारे यांची जागा ताकतीने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, त्यांनी अनेक समित्यांवर काम केलं असून येत्या काळामध्ये त्यांची वाटचाल मोठी असेल. 


अर्चना पाटील भाजप प्रवेशावर फडणवीस म्हणाले...


दरम्यान अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, अर्चना पाटील सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होत्या. चाकूरकर पाटील यांनी जो वारसा तयार केला आहे ती खूप चांगली गोष्ट आहे. प्रामाणिक राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठा नेता प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली. जर कोणी भाजपमध्ये प्रवेश करणार असेल, तर तुम्हीच त्याचं नाव मला सांगा असा उलट प्रश्न त्यांनी केला. कोणताही नेता प्रवेश करणार नसून आम्ही ऑपरेशन करतो तुम्हाला ते कळतही नाही आणि तुम्हाला कळलं तर ऑपरेशन होत नसल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. आज तरी असे काही होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. 


महायुतीमध्ये चार ते पाच जागांवर वाद


दरम्यान, महायुतीमध्ये चार ते पाच जागांवर वाद असल्याचे मान्य केले. महायुतीमध्ये अजूनही चार ते पाच जागांवरती वाद असून या जागांवर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुसरीकडे, अमित देशमुख यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. मात्र, देशमुख माझ्या संपर्कात नसून तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. 


दरम्यान, अंबादास दानवे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. देवेंद्र फडणीस यांना सातत्याने हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी ते विरोधी पक्षनेते असून त्यांना का त्रास देत आहात? आमचं त्यांच्याशी कुठलंही बोलणं झालेलं नाही. आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या