सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी  ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 


याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले.


'ग्लोबल टीचर' म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती


ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या आणि ओघाओघाने भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.


कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून, पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 


Majha Katta : ग्लोबल टिचर्स पुरस्काराने सन्मानित झालेल्या रणजीतसिंह डिसले गुरुजींसोबत रंगला 'माझा' कट्ट्या



डिसले गुरुजी ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते


युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' आज जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला होता. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते.


पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते. यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल, असा त्यांचा मानस होता. 


ग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय?


यात जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :