शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भाग्यश्री बानायत धिवरे रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. तर बगाटे थेट IAS नसल्यानं त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. 


काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानायत यांची नेमणूक करण्यात आली आहे. बगाटे मात्र अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 


कान्हूराज बगाटे यांच्या बदलीनंतर शिर्डीत फटाके फोडले


कान्हूराज बगाटे यांच्या बदलीनंतर शिर्डीत फटाके फोडण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. फटाके कोणी फोडले हे अद्याप समजले नसले तरी काही ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडले असल्याची चर्चा सुरू आहे. साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीनंतर असे फटाके फोडले गेले आहेत. 


कान्हूराज बगाटे यांची वादग्रस्त कारकिर्द


कान्हूराज बगाटे हे पदभार स्वीकारल्यापासूनच चर्चेत होते. त्यांची नेमणूक करताना ते थेट IAS नसल्यानं त्यांची नेमणूक रद्द करावी अशी याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने देखील या याचिकेची सुनावणी करताना नेमणूक रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.


बगाटे यांनी आपल्या कारकिर्दीत पत्रकारांना अनेक बंधन टाकून नियमावली जाहीर केली. तर ग्रामस्थ दर्शन प्रश्नावरही वाद निर्माण झाला होता. बगाटे यांच्या कार्यकाळात काही दिवसांपूर्वी संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश यांचे मंदिरात जाताना  CCTV व्हायरल झाले होते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर दोन दिवसांपूर्वी सुनावणी होऊन न्यायालयाने पोलिसांना नोटीस काढून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज अचानक कान्हूराज बगाटे यांच्या जागेवर भाग्यश्री बानायत यांची नेमणूक राज्यसरकारने केली असून कान्हूराज बगाटे मात्र नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.