नागपूरः नागपूर जिल्ह्यात दहा दिवसांत 132 रुग्ण आढळले. तसेच मार्च नंतर पहिल्यांदाच दोन कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आल्यावर नागपूर महानगरपालिकेला अखेर जाग आली. तसेच शनिवारपासून मनपाच्यावतीने रेल्वे स्थानकावर कोरोना चाचण्यांची सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाची चौथी लाट उंबरठ्यावर असताना राज्यातील अनेक शहरांत कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. यावर सरकार अलर्ट मोडवर आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबीकडे कमालीचे दुर्लक्ष केले होते.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना मनपा आणि रेल्वे प्रशासन कोरोना प्रादुर्भाव वाढत असलेल्या विविध प्रांतातून येणाऱ्या प्रवाशांना थेट प्रवेश देत असल्याने जिल्ह्यात कोरोना पसरण्याची दाट शक्यता वाढली होती. याबाबत सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये मनपा आणि रेल्वे प्रशासनाबाबत नकारात्मक चर्चा सुरु झाल्यावर मनपाने रेल्वे स्थानकावर चाचण्यांना सुरुवात केली आहे. सध्या सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री आठ या दोन शिफ्टमध्ये चाचण्या करण्यात येत आहे. तसेच सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्यावतीने देण्यात आली आहे.
रविवारीही चाचणी केंद्र सुरु
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रविवारी देखील शहरातील कोरोना चाचणी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक मोजणार किंमत
केंद्र आणि राज्य सरकारकडून सतर्कतेचे आदेश देऊनही स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असेल तर त्याची किंमत निरअपराध नागरिकांना चुकवावी लागेल.
प्रवाशांचाही निष्काळजीपणा
नागपूर रेल्वे स्थानकावर बाहेरचे अन् स्थानिक नागरिक असलेल्या प्रवाशांकडूनही मास्कचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणीही प्रवाशी बिनधास्त फिरत आहेत.
पूर्वी होती व्यवस्था
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर महानगरपालिका प्रशासनाकडून आरपीएफ ठाण्याच्या बाजूला कोरोना तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. दोनवेळा कोरोनामुळे माजलेल्या तांडवातूनही प्रशासनाने धडा घेतला नसल्याने याची किंमत मात्र सामान्य नागरिकांना मोजावी लागणार असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या