नागपूर : नागपुरात अमरावती महामार्गावर भोळे पेट्रोल पंप चौक ते म्हाडा कॉलनी दरम्यान जाहिराती फलकांवर अज्ञात व्यक्ती देशविरोधी घोषणा आणि अपशब्द लिहिल्याने खळबळ माजली आहे.

भोळे पेट्रोल पंप चौकापासून म्हाडा कॉलोनी दरम्यान दुभाजकावर एका रांगेत लोखंडी फलक लावलेले आहेत. या फलकांवर अज्ञात व्यक्तींनी हिंदुस्थान मुर्दाबाद, हिंदुस्तानचे सरकार मुर्दाबाद अशा देशविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. तसेच भोळे पेट्रोल पंपजवळ सर्वोदय आश्रम समोरच्या बस स्टॉप वरही अशाच घोषणा लिहिल्या गेल्या होत्या.

सकाळी ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या. लगेचच पोलिसांनी घटनस्थळी येऊन देश विरोधी आणि देशाच्या शासनाच्या विरोधात लिहिलेल्या सर्व घोषणा, अपशब्द पुसून काढले.

काही ठिकाणी पांढऱ्या तर काही ठिकाणी काळ्या रंगाने लिहिलेल्या घोषणांच्या खाली एक दोन ठिकाणी नितीन गडकरी यांच्या विरोधात अपशब्द लिहिलेले आढळून आले. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरात चौकशी सुरु केली असून पुढील तपास करत आहे.

विशेष म्हणजे नागपुरात गेल्या काही वर्षांपासून शहरी नक्षलवादाचा प्रभाव वाढला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अनुषंगानेही नागपुरात अटकसत्र सुरु होते. त्यामुळे देश विरोधी घोषणा लिहिण्यामागे नक्षलींचा तर हात नाही ना? अशी शंकाही निर्माण झाली आहे. कारण गडचिरोली आणि इतर नक्षल प्रभावित परिसरात देशाच्या विरोधात नक्षली शासनाच्या विरोधात नेहमीच घोषणा लिहीत असतात.