अहमदनगर : सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींजींच्या जयंतीदिनी अण्णा आपलं गाव राळेगणसिद्धीतून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.


अण्णांनी लोकपालसह विविध मागण्यांसाठी मार्च महिन्यात दिल्लीत सात दिवस उपोषण केलं होतं. सरकारने मागण्या मान्य करण्याचं लेखी दिल्यानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतलं. पण अद्यापही लोकपालची नियुक्ती झालेली नसल्यामुळे त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.


जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील काही महत्त्वाच्या बदलांसाठी अण्णांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर सात दिवस उपोषण केलं. 23 मार्च म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सुरु करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यात आलं.

दरम्यान, लोकपालच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारकडून बैठकांचं सत्र सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर सदस्यांची नुकतीच एक बैठक झाली होती. मात्र या प्रक्रियेला वेग येत नसल्याने अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी त्यांना पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली आहे.

लोकपालची नियुक्ती झाल्यास देशात भ्रष्टाचाराचं प्रमाण 60 ते 70 टक्क्यांनी कमी होईल, असं अण्णांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या :

सातव्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण मागे


''विलासरावांनी दोन भेटीत उपोषण सोडवलं, भाजपला सुरुवातच माहित नाही''