मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. मातोश्री’वर उद्या (30 जुलै) दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.


शिवसेनेच्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात  येणार आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत,’ असं याआधीच शिवसेनेने जाहीर केलं आहे. त्यामुळे या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार, हे पाहावं लागेल.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकी पाहायला मिळत आहेत.

ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चाने घेतली. त्यामुळे सरकारी पातळीवरही हालचालींना वेग आला आहे.

मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक

मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. राज्यसभा खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या आंदोलकांची नावं मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आली नाहीत.

‘मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही,’ असं मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केलं. आधीच मागण्या दिलेल्या असताना चर्चेचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. तसा ठरावही आज लातूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लातूरमध्ये मराठा मोर्चाची बैठक

लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते. बार्शी रोडवरील राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून ही बैठक सरू झाली. विविध निर्णय यामध्ये घेण्यात आले.

लातूरमधील बैठकीतील निर्णय

1 ते 9 ऑगस्ट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार.

राज्यातील प्रत्येक गावाच्या वेशीवर समाज बांधव गुराढोरांसह ठिय्या देणार

राज्यातील सर्व मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन होणार

गुन्हे सरसकट तातडीने मागे घ्यावेत