अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फेब्रुवारी महिन्यात जनलोकपाल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत 20 किंवा 25 फेब्रुवारीला आंदोलन करु, असं अण्णांनी जाहीर केलं आहे.
राळेगणसिद्धीमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली. रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा राजघाटवर आंदोलन होण्याची शक्यता आहे.
''मोदींपेक्षा फडणवीस चांगले''
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं असल्याचं अण्णांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी चुकीचं काम करत असून फडणवीस यांचं काम योग्य असल्याचं अण्णांनी सांगितलं. शिवाय फडणवीस चुकले, तर त्यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा द्यायलाही अण्णा विसरले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘अच्छे दिन’चं स्वप्न दाखवलं. पंधरा लाखाचं अश्वासन देऊन जनतेची निराशा केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर जनलोकपाल बील कमजोर केलं. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला. त्यामुळे दिल्लीतल्या आंदोलनाने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे.
जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी पंतप्रधान मोदींना याअगोदर अनेकदा पत्र लिहिलं आहे. मात्र मोदींकडून पत्राला काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.