अहमदनगर : एका ऑडिओ क्लिपमुळं सध्या चर्चेत असलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला आहे. दरम्यान या प्रकरणावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी योग्य त्या कारवाईसाठी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे.
'असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. या घटनेनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी ज्योती देवरे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत अण्णांना दाखवली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर योग्य त्या कारवाईसाठी वेळ पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.
देवरे यांच्यावर कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका
तहसीलदार ज्योती देवरे यांनी अनेक कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. तसेच वाळू साठ्यात गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर आहे. ज्योती देवरे यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही. कामात हयगय केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचा इशारा, आमदार निलेश लंके म्हणाले..
ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी अमरावतीचे वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिपमध्ये केले आहे. तहसीलदार यांच्या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून ज्योती देवरे यांनी स्वतःची ऑडिओ क्लिप तयार केलीय. मी लवकरच तुझ्या सोबत येत आहे, असं सांगून महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो याचा उल्लेख ज्योती देवरे यांनी केलाय. आपल्याविरुद्ध प्रश्न उपस्थित करणे, दमदाटी करणे, मी मारहाण करते असे माझ्या गाडीत चालकाकडून लिहून घेणे, धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याचे देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. इतकेच नाही तर कोविड लसीकरणावरून आमदार निलेश लंके यांनी आरोग्य कर्मचार्याला मारहाण केली आणि नंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. या घटनेचा उल्लेखही ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप मध्ये केलाय.
पारनेरच्या तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची फडणवीस यांच्याकडून दखल, मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र
ज्योती देवरे ऑडिओ क्लिप
प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खरं तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद मी गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा. पण या चिमुकल्या पंख्यात आता त्राण राहिले नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.
पारनेर आमदार निलेश लंके
तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्वतःच्या बचावासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी म्हणलंय. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असुन तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील जेव्हा तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना सूचना केल्या. मात्र, त्यावेळी आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री अपरात्री केल्याचेही निलेश लंके यांनी सांगितलं. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला प्रयत्न असल्याचं निलेश लंके स्पष्ट केलंय.