राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून होऊ घातलेल्या आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टाईला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. मात्र अण्णांची मागणी मान्य न झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून अण्णांची मनधरणी करण्यात येत होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह पुन्हा अण्णांची भेट घेतली आणि अण्णांची मनधरणी केली.


यावर बोलताना अण्णा म्हणाले की, आम्ही पंधरा मुद्दे केंद्र सरकारला दिले आहेत. त्या मुद्द्यांवर उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ती कारवाई होईल असा मला विश्वास वाटतो. म्हणून उद्या होणारं उपोषण मी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.


देवेंद्र फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, अण्णा 30 तारखेच्या आंदोलनावर ठाम


अण्णांच्या मागण्यासंदर्भात उच्चाधिकारी समिती - फडणवीस
यावेळी फडणवीस म्हणाले की, अण्णांचे सगळे मुद्दे आम्ही केंद्रासमोर मांडले. अण्णांनी पुन्हा काही मुद्दे दिले. सगळे मुद्दे आम्ही केंद्र सरकारकडे मांडले. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आले आहेत. उच्चाधिकारी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला सहा महिन्याचा अवधी असेल. अण्णा देतील ती नावं या समितीत असतील. अण्णांना दिलेल्या आश्वासनानुसार लोकपाल नियुक्त झाले. त्यातही काही सुधारणा अण्णांनी सुचवल्या. त्याबाबतही उच्चस्तरीय बैठक अण्णांच्या उपस्थितीत दिल्लीत घेतली जाईल, असं ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, अण्णा हजारेंच्या मागणीनुसार समिती स्थापन करण्यात येतेय. स्वतः कृषिमंत्री, नीती आयोगाचे सदस्य आणि अण्णा सुचवतील त्या व्यक्तींची त्यामध्ये निवड केली जाईल. अण्णांना दिल्लीत आमंत्रित करुन एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत कृषी संदर्भात आणि निवडणूक सुधारणेसंदर्भात चर्चा करुन कारवाई करण्यात येईल. आम्ही अण्णांना या समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्याची आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केलीय. अण्णांनी ही विनंती मान्य करत समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्याच मान्य केलंय, असं ते म्हणाले.


समितीला सहा महिन्यांची मुदत- केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, एम एस पी दीडपटीने वाढवण्यात आलाय. प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत. अशाप्रकारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला दिले जात आहेत. अण्णांनी मागणी केलेल्या समितीचे प्रमुख केंद्रीय कृषिमंत्री महेंद्रसिंग तोमर असतील. या समितीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलीय.अण्णांना आम्ही आंदोलन करु नये अशी विनंती केली आणि त्यांनी ती मानली. अण्णांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय रद्द केलाय, असं ते म्हणाले.


Anna Hazare | केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास जानेवारी महिन्यात अण्णा हजारे आंदोलन करणार