अमरावती : वाशिममधील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादाला समृद्धी महामार्गाची किनार आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण खासदार भावना गवळी यांची ठेकेदाराला काम न करण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे हा वाद आता कोणत्या टोकाला जाईल हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
सध्या एक ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल होत आहे. यामध्ये खासदार भावना गवळी एका ठेकेदाराला थेट सांगताय की तुम्ही त्या कामाकडे जाऊ नका ते काम उद्धव ठाकरे साहेबांनी मला दिलंय. तो ठेकेदार सांगतोय की मला हे काम कंपनीने दिले आहे. तरी सुद्धा, तुझी कंपनी मोठी की उद्धव साहेब मोठे? असं बोलून भावना गवळी दमदाटी करताना दिसत आहेत. या क्लिपमध्ये जरी समृद्धी महामार्गाचा उल्लेख नसला तरी हे त्या संदर्भातच असल्याचं बोललं जात आहे. आता या क्लिपवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांचा वाद तसा जुनाच आहे. 1998 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेवर राजेंद्र पाटणी यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि ते निवडून सुद्धा आले होते. यावेळी राजेंद्र पाटणी यांना भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी तिकीट मिळण्यासाठी मदत केली होती. तेव्हा पुंडलिकराव गवळी हे वाशिम शिवसेनेचे खासदार होते. त्यानंतर 2004 मध्ये कारंजा विधानसभेवर तिकिटावर राजेंद्र पाटणी यांना उमेदवारी देण्यात आली आणि कारंजातून ते निवडून सुद्धा आले.
मात्र 2009 मध्ये पाटनी यांचा कारंजामध्ये पराभव झाला. 2012 मध्ये राजेंद्र पाटणी यांनी वाशिम आणि कारंजा या दोन नगरपालिकेची निवडणूक आपल्या नेतृत्वामध्ये लढवली आणि यावेळी त्यांनी स्थानिक आघाडी उभी केली होती. तेव्हा खासदार भावना गवळी यांनी थेट मातोश्रीवर त्यांची तक्रार केली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र पाटणी यांना कारंजामधून संधी मिळाली नाही. तेव्हा त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली आणि निवडून सुद्धा आले. 2019 मध्ये परत भाजपने राजेंद्र पाटणी यांना संधी दिली आणि पुन्हा तिथून निवडून आले.
खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्या खडाजंगीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या दोघांच्या वादानंतर आता कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात धमकी दिल्याच्या तक्रारी दिल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर खडाजंगी झाल्याचं सांगत असले तरी कारण मात्र वेगळंच आहे हे या आजच्या ऑडिओ क्लिपवरून समोर येत आहे.