इंदापूर : संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज इंदापूर येथून पायी चालत सहभागी झाले. त्यामुळे सहभागी वारकऱ्यांमध्येही आणखी उत्साह भरला होता.
हा दिंडी सोहळा काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी चालू केला होता. ती दिंडी पिंपळणेर करमाळा, टेंभुर्णी मार्गे पंढरपूरकडे जात होती. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे बारामती इंदापूर अकलुज मार्गे पंढरपूरला जात असते. या मार्गावर कोठेही या दोन्ही पालखीतील गुरू शिष्यांची भेट होत नव्हती. त्यामुळे निळोबाराय यांच्या पालखीचा मार्ग बदलून तो आता पिपळणेर भिगवण इंदापूर टेंभुर्णी करकंब मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.
संत निळोबाराय यांचा पालखी सोहळा गेले कित्येक वर्षे पारनेर तालुक्यातील पिंपळनेरमधून करमाळा मार्ग विठूरायाच्या पंढरीत जात आहे.
निळोबाराय यांचे गुरू संत तुकाराम महाराज आहेत. गुरू-शिष्य यांच्या पालखीची भेट या वेगवेगळ्या मार्गावरून गेल्यामुळे होत नव्हती. गुरू शिष्यांची भेट व्हावी म्हणून निळोबाराय यांच्या पालखी सोहळा प्रमुखांनी पालखीचा मार्ग बदलला आणि आज प्रथमच इंदापूर येथे संत तुकाराम महाराज व निळोबाराय यांच्या पलखीची ऐतिहासिक भेट संपन्न झाली.
गुरू शिष्यांच्या पालखी भेटीचा पहिला ऐतिहासिक सोहळा इंदापूर येथील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये पार पडला या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचा पालखी मुक्काम असतो. त्याठिकाणी निळोबाराय यांची पालखी गुरूच्या भेटीसाठी अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत तीन वाजता नेण्यात आली आणि दोन्ही पालखीतील पादुका एक एकमेकांना लावून पुष्पहार घालण्यात आले. पालखी प्रमुखांनी ऐकमेकांचे स्वागत केल्यानंतर आरती करून निळोबाराय यांची पालखी सरडेवाडी येथील मुक्कामाकडे रवाना झाली.