अहमदनगर : मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यात मध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर ईडीने कारवाई का केली काही दिवसांनी पुढे येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.


आपसात संगनमत करून शिखर सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाला. या सारखाच सहकारी कारखान्यांचा देखील घोटाळा आहे. सहकारी बँक आणि साखर कारखाने घोटाळा सारखाच आहे. यासाठी मी अनेक पुरावे दिले आहेत. पुरावे देऊनही सीआयडीच्या डीआयजी जय जाधव यांनी अहवालात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करत दोषी धरावं, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

काल या प्रकरणातील तक्रारकर्ते राजू शेट्टी यांनी देखील शरद पवारांची पाठराखण केली होती. शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. मी पवारांवर कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत असे  राजू शेट्टी म्हणाले होते. शेट्टी म्हणाले होते की, मी चुकीचं समर्थन करणार नाही. चौकशी झाली पाहिजे. चोरांना पकडलेच पाहिजेत. यासाठी  मी ईडीला भेटलो. याचिका दाखल केली. अण्णा हजारेंनी देखील तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितलं. यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत. संचालक मंडळाने लायक नसलेल्या लोकांना कर्ज दिले, असा आरोप शेट्टी यांनी केला होता.

ज्यांच्या आशिर्वादाने कर्ज दिले ते बहुसंख्य लोक भाजपमध्ये आहेत, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा भाजपा आणि सरकार आपल्या सोयीने वापर करून घेत आहे, असेही ते म्हणाले होते.